धारवाड येथील आर. एन. शेट्टी क्रीडांगणावर ७१ व्या कन्नड राज्योत्सवानिमित्त ध्वजारोहण केल्यानंतर पालकमंत्री संतोष लाड यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दूध दरवाढीचे समर्थन करत केंद्र सरकारवर टीका केली.

गेल्या १२ वर्षांत पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ झाली आहे. इतर राज्यांच्या तुलनेत राज्यात दूध दरात मर्यादित वाढ केली असून, दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी प्रतिलिटर आठ रुपये वाढविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीवर भाजप नेते प्रश्न उपस्थित करीत नाहीत; मात्र दूध दरवाढीवर टीका करतात, असा टोला त्यांनी लगावला.


ऊस उत्पादकांच्या आंदोलनाला राज्य सरकारचा पाठिंबा असून, शेतकऱ्यांना योग्य दर मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहण्यास हरकत नसल्याचे लाड म्हणाले. इथेनॉल खरेदी दर आणि साखर कारखान्यांना दिले जाणारे कोटे याबाबत केंद्र सरकारने योग्य निर्णय घ्यावा. इथेनॉलच्या दरातून प्रतिलिटर चार रुपये शेतकऱ्यांना दिल्यास त्यांना आर्थिक मदत होऊ शकते, असेही त्यांनी नमूद केले.

दिल्लीतील काँग्रेसच्या आंदोलनाबाबत बोलताना मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन होत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपने गेल्या १२ वर्षांत केलेल्या कामगिरीवर चर्चा व्हावी. केवळ प्रसिद्धीपेक्षा प्रत्यक्ष कामगिरी महत्त्वाची आहे, अशी टीकाही त्यांनी केली.


Recent Comments