कर्नाटक राज्योत्सव पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक आणि भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे माजी अध्यक्ष डॉ. जिनदत्त देसाई यांचे १ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व हरपले आहे.
३ एप्रिल १९३३ रोजी धारवाड जिल्ह्यातील अम्मिनभावी येथे त्यांचा जन्म झाला. धारवाड येथे एलएलबीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी १९६२ मध्ये वकिलीला सुरुवात केली. १९६६ ते १९९१ या काळात बेळगाव येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून सेवा बजावली.

कवी, लेखक आणि समाजसेवक म्हणून त्यांची ओळख होती. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. न्यायालयीन सेवेदरम्यान लेखन थांबवले होते; मात्र सुमारे ३० वर्षांच्या खंडानंतर ‘मत्ते बंदिद्देने’ या काव्यसंग्रहातून त्यांनी पुन्हा लेखन सुरू केले. त्यांच्या कविता १८ संग्रहांत प्रकाशित झाल्या असून, त्यांच्या साहित्यावर अनेक विद्यार्थ्यांनी पीएचडी पदवी मिळवली आहे.
भरतेश एज्युकेशन ट्रस्टमध्ये डॉ. ए. एन. उपाध्ये कन्नड अध्ययन केंद्र सुरू करण्यात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. कन्नड आणि इतिहास विषयांतील पदव्युत्तर तसेच पीएचडी अभ्यासक्रमांसाठी त्यांनी पुढाकार घेतला होता.
२०१५ मध्ये राणी चन्नम्मा विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट, २०१७ मध्ये कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार, २०२१ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार आणि २०२२-२३ मध्ये भगवान महावीर शांतता राष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. श्रवणबेळगोळ येथे २०१८ मध्ये झालेल्या अखिल भारतीय जैन साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी आणि परिवार आहे. सोमवार, २ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता सदाशिवनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


Recent Comments