मेकेदाटू योजनेसाठी २,५०० एकर पर्यायी जमीन निश्चित मेकेदाटू येथे ६० टीएमसी पाणी साठवण्याचे उद्दिष्ट : मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार कावेरी खोऱ्यातील शेतकऱ्यांना योजनेचा मोठा लाभ होणार जमीन संपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार एच. डी. कुमारस्वामी यांच्या आरोपांना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे प्रत्युत्तर
मेकेदाटू योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने हालचालींना वेग दिला असून, वनक्षेत्राला पर्याय म्हणून २,५०० एकर जमीन यापूर्वीच निश्चित करण्यात आली आहे. केंद्र सरकारची अंतिम मंजुरी मिळताच योजनेच्या कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.

मंड्या येथील होळळू सर्कलसमोर जिल्हा काँग्रेस भवनाच्या पायाभरणी कार्यक्रमात शनिवारी ते बोलत होते. कावेरी पाणीवाटपाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने मेकेदाटू योजना महत्त्वाची असून, तिच्या अंमलबजावणीसाठी सरकार वेगाने प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
योजनेसाठी आवश्यक असलेल्या वनजमिनीच्या बदल्यात पर्यायी जमीन उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समितीकडे सोपविण्यात आली आहे. यासंदर्भात समितीच्या बैठका झाल्या असून, वनविभागाला द्यावयाच्या पर्यायी जमिनीपैकी २,५०० एकर जमीन निश्चित करण्यात आली आहे. उर्वरित जमिनीचा शोधही सुरू आहे. या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची केवळ १०० ते ५०० एकर जमीन संपादित करावी लागणार असून, त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. जमिनीचा तपशील केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड केल्यानंतर अंतिम मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.
मेकेदाटू योजनेमुळे कावेरी खोऱ्यातील शेतकऱ्यांसह हेमावती सिंचन क्षेत्रालाही मोठा लाभ होणार आहे. मेकेदाटू येथे सुमारे ६० टीएमसी पाण्याचा साठा करता येणार असल्याने पाणीटंचाईच्या काळात पाणी सोडण्याबाबतच्या अडचणींवर नियंत्रण ठेवणे शक्य होईल, असे शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, एअर युनिटच्या उभारणीसाठी जागा दिली नसल्याच्या एच. डी. कुमारस्वामी यांच्या आरोपावरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. यासाठी यापूर्वीच १०० एकर जमीन देण्यात आली असून, अतिरिक्त जागेची मागणी झाल्यास तीही देण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही वाद नसलेली आणि शेतकऱ्यांचा विरोध नसलेली जमीनच उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी केपीसीसी अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद, मंत्री चलुवरायस्वामी, नरेंद्र स्वामी, आमदार उदय, रवी गणिग, रमेश बंदिसिद्धेगौडा आदी उपस्थित होते.


Recent Comments