gokak

गोकाकमध्ये बैलगाड्या रस्त्यावर उभ्या करून शेतकऱ्यांचे आंदोलन; सरकार आणि कारखानदारांविरोधात संताप

Share

ऊसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी गोकाक तालुक्यातील कोन्नूर येथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसिरू सेनेने राष्ट्रीय महामार्ग बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार कोन्नूर येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर बैल बांधून आणि बैलगाड्या उभ्या करून आंदोलन केले. प्रति टन उसाला ५,५०० रुपये दर, साखरेला प्रतिकिलो ६० रुपये किमान आधारभूत किंमत, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि राज्यातील उत्पादित इथेनॉलची संपूर्ण खरेदी करावी, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.

या आंदोलनात शेतकरी नेते आणि वकील रमेश ईरणट्टी यांनी सरकार तसेच साखर कारखानदारांविरोधात संताप व्यक्त केला. शेतकरी दरवर्षी आपली जमीन विकण्याच्या परिस्थितीत आहेत, तर कारखानदार लाच देऊन सरकारकडे आणखी कारखाने सुरू करण्यासाठी अर्ज करत आहेत. ऊस पुरवणारे शेतकरी आहेत, सरकार नाही, असे त्यांनी सुनावले.

आज रस्ता रोखला आहे; मात्र उसाला योग्य दर निश्चित झाला नाही, तर सरकारला मिळणारा मद्यविक्रीचा महसूलही बंद करू, असा इशारा ईरणट्टी यांनी दिला. साखर कारखानदारांवर टीका करताना त्यांनी, कारखानदारांनाच मधुमेहाचा त्रास असल्याचे वक्तव्य केले. औद्योगिक क्षेत्राला अडचण निर्माण होईल, या कारणास्तव महामार्ग बंद करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेल्या निर्बंधांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकाऱ्यांना शेतकऱ्यांची काळजी नसल्याचा आरोप करत, अशा भूमिकेमुळे त्यांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा कमी करू नये, असे ते म्हणाले.

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास सरकार आणि साखर कारखानदार दोघांनाही परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी दिला. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.

Tags: