बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधच्या प्रांगणात १०८ फूट उंचीचा श्री भुवनेश्वरी देवीचा भव्य कांस्यपुतळा उभारण्याच्या मागणी निवेदनाला मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

सरकारी विश्रामगृहात श्रीनिवास ताळूकर यांच्या नेतृत्वाखाली कन्नड संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली व अधिकृत निवेदन सादर केले. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सुवर्णसौधच्या आवारात आधीच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायाण्णा आणि महात्मा गांधी यांचे पुतळे सुशोभित आहेत. त्याच धर्तीवर बंगळुरूमधील केम्पेगौडा पुतळा आणि गुजरातमधील सरदार पटेल यांच्या पुतळ्याप्रमाणे देशपातळीवर लक्ष वेधण्यासाठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ १०८ फूट उंच भुवनेश्वरी देवीचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी ‘सर्वोदय स्वयंसेवा संघ’ व विविध कन्नड संघटना सातत्याने करत होत्या.

कन्नड कार्यकर्ते श्रीनिवास ताळूकर यांच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारताना मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आगामी बेळगाव अधिवेशनात यावर योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. या प्रकल्पासाठी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही पूर्ण सहकार्य दर्शवले असून शासकीय स्तरावर तातडीने पावले उचलण्याची सूचना केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या सकारात्मक भूमिकेमुळे संघटनांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून सुवर्णसौधसमोर लवकरच भुवनेश्वरी देवीचा भव्य पुतळा उभा राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Recent Comments