Kittur

कित्तूर महोत्सवात गजबजला आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचा आखाडा

Share

बेळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक कित्तूर महोत्सवाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने आयोजित पुरुष व महिलांच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धा अत्यंत दणक्यात पार पडल्या.

या कुस्ती आखाड्यात राज्य, आंतरराज्य तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ख्यातनाम मल्लांनी सहभाग घेऊन आपली ताकद, कुवत आणि कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन घडवले. या स्पर्धेत एकूण ६३ जोड्यांनी सहभाग घेतला असून, पैलवानांमधील अटीतटीच्या व रोमांचक लढतींनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

महिलांच्या कुस्ती आखाड्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली. कडोलीची पैलवान स्वाती पाटील आणि कोल्हापूरची सुहानी देसाई यांच्यात झालेल्या अटीतटीच्या मुकाबल्यात कडोलीच्या स्वाती पाटील हिने विजय मिळवला.

दुसरीकडे, पुरुष गटातील मुख्य आणि सर्वांत आकर्षक आखाड्यात महाराष्ट्राचा ख्यातनाम पैलवान सिकंदर शेख आणि क्युबाचा पैलवान कास्तानेडा कार्डेनास यांच्यात तुमुळ लढत झाली. या अटीतटीच्या व रोमांचक कुस्ती सामन्यात महाराष्ट्राच्या सिकंदर शेखने बाजी मारत विजयश्री संपादन केली.

कित्तूर महोत्सवातील प्रमुख आकर्षण असलेल्या या कुस्ती स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी यंदाही हजारोच्या संख्येने कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहून पैलवानांच्या कसरतींना उत्स्फूर्त दाद दिली.

शानूल मत्तेखान, कित्तूर

Tags: