Belagavi

स्वातिक पाटीलचे आम. हेब्बाळकरांकडून कौतुक

Share

एशियन पॅरा गेम्समध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या बेळगाव तालुक्यातील मुतगा येथील स्वातिक पाटील याचे माजी मंत्री व आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करत पदक जिंकून स्वातिक पाटील याने देशाचा व राज्याचा गौरव वाढवला आहे. त्याची ही कामगिरी केवळ मुतगा गावासाठीच नव्हे, तर संपूर्ण बेळगाव जिल्हा आणि राज्यासाठी अभिमानास्पद बाब आहे, असा आनंद लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केला. देशाच्या संरक्षण सेवेत कार्यरत राहिलेले माजी सैनिक नारायण व चांगुणा दांपत्याचा मुलगा असलेल्या स्वातिकने आपल्या दृढनिश्चय, अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रीडा व्यासपीठावर हे उल्लेखनीय यश मिळवले आहे. पालकांचे त्याग, प्रोत्साहन आणि स्वातिकचे कठोर परिश्रम या यशामागे महत्त्वाचे ठरले आहेत. अपंगत्वावर मात करत आत्मविश्वासाने मिळवलेला हा विजय क्रीडा क्षेत्रात नवीन आशा निर्माण करणारा आहे. त्याचे हे यश कोट्यवधी तरुणांना, विशेषतः क्रीडाप्रेमींना प्रेरणा देणारे ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. येत्या काळात स्वातिक पाटील याने आणखी मोठी मजल मारत देशासाठी सुवर्णपदके जिंकून भारताची कीर्ती उंचावावी, अशा शुभेच्छा लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिल्या.

Tags: