Belagavi

कडोलीत कृषी परंपरेनुसार दसरा उत्सव; सजवलेल्या बैलजोड्यांच्या मिरवणुकीने वेधले लक्ष

Share

बेळगाव तालुक्यातील कडोली गावात विजयादशमीनिमित्त ग्रामीण संस्कृती आणि कृषी परंपरेला साजेसा दसरा उत्सव साजरा करण्यात आला.

सुशोभित बैलजोड्यांची मिरवणूक आणि श्री कलमेश्वर मंदिरात केलेली नैसर्गिक पाना-फुलांची आरास हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले.

कडोलीत पिढ्यानपिढ्या पारंपरिक पद्धतीने दसरा साजरा करण्याची प्रथा आहे. शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्यांना आकर्षक पद्धतीने सजवून लोकवाद्यांच्या तालावर मिरवणूक काढली. देशभरात दसऱ्याला दुर्गापूजनाला प्राधान्य दिले जात असताना, कडोलीत महादेवाचे रूप असलेल्या श्री कलमेश्वराची पूजा करण्याची विशेष परंपरा आहे. मंदिराच्या आवारात केळीचे खांब, ऊस आणि झेंडूच्या फुलांचा वापर करून साकारलेली भव्य आरास भाविकांचे लक्ष वेधून घेते.. शिवाय या देवस्थानाच्या पालख्या प्रस्थान होताच आणि सीमोल्लंघन पार पडताच संपूर्ण परिसरात आणि देवस्थानात उभारण्यात आलेले केळीचे खांब, ऊस, हे बन्नी मोडणाच्या विधीनुसार मानाने मोडले जातात. हा सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक उत्साहाने सहभागी होतात. यावेळी देवस्थानात महा आरती देखील पार पडते.

कडोली गावात दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी वार्षिक यात्रा देखील साजरी केली जाते. त्यामुळे येथील पारंपरिक दसरा उत्सव पाहण्यासाठी आणि येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वराचे दर्शन घेण्यासाठी कडोलीसह बेळगाव शहर आणि परिसरातील नागरिक देखील मोठ्या संख्येने सहभागी होतात.

दरम्यान, यंदा मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांऐवजी मोठ्या आवाजात डीजे वाजवण्यात आल्याने उत्सवाच्या मूळ स्वरूपाला बाधा पोहोचल्याची भावना व्यक्त झाली. तीव्र आवाजामुळे त्रासलेल्या काही ज्येष्ठ नागरिकांना मिरवणुकीच्या वेळी शेताचा आसरा घ्यावा लागला. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली होती.

Tags: