बेळगाव मधील रामतीर्थनगरमध्ये विजयादशमीनिमित्त शमीपूजनासहित दसरा उत्सव अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात पार पडला.

श्री कार्यसिद्धी आंजनेयस्वामी मंदिराजवळ आयोजित या कार्यक्रमात काँग्रेस नेते विनय नवलगट्टी व त्यांच्या पत्नी मधुरा नवलगट्टी यांनी आपट्याच्या वृक्षाचे पूजन करून भाविकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलताना विनय नवलगट्टी यांनी, केवळ अनिष्ट शक्तींचा नाश करणे एवढाच विजयादशमीचा अर्थ नसून, मनुष्याने मनातील अहंपूरक भावना व मत्सराचा त्याग करून एकमेकांशी आपुलकीचे नाते जपणे हा या सणाचा खरा संदेश असल्याचे प्रतिपादन केले. तसेच विजयादशमीचा दिवस हा ज्ञानाचा आणि बालकांच्या अक्षराभ्यासासाठी अत्यंत शुभ मानला जात असल्याने, पालकांनी आपल्या पाल्यांवर योग्य संस्कार करून त्यांना सुजाण नागरिक घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.
प्रारंभी मंदिर समितीचे अध्यक्ष सुरेश उरबीनहट्टी यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमात लता केरूर यांनी मधुरा नवलगट्टी यांचा, तर आनंद करलिंगन्नवर यांनी विनय नवलगट्टी यांचा शाल पांघरून सत्कार केला. पौरोहित्य प्रकाश दीक्षित यांनी केले.
या सोहळ्यास शिवानंद मठपती, विलास केरूर, महादेव टोण्णे, संतोष सनदी, बसवराज हिरेमठ, मल्लाप्पा दंडीनवर यांच्यासह रामतीर्थनगर परिसरातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Recent Comments