उसाला प्रतिटन ५ हजार ५०० रुपये दर मिळावा या मागणीसाठी सुरू असलेला शेतकऱ्यांचा लढा यशस्वी होत असून, २६ ऑक्टोबर रोजीच्या बैठकीतील निर्णयानंतरच राज्यातील कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू केले जातील, अशी माहिती शेतकरी नेते चुनप्पा पुजारी यांनी दिली.
बेळगाव येथील सुवर्ण विधानसौधमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साखर कारखाना मालक व शेतकरी प्रतिनिधींची बैठक होणार आहे. या बैठकीतील निर्णयानंतरच राज्यातील कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू केले जातील, अशी माहिती शेतकरी नेते चुनप्पा पुजारी यांनी दिली.

उसाला रास्त आणि फायद्याचा दर मिळावा यासाठी शेतकरी संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने ही महत्त्वाची बैठक बोलावली आहे. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारकडून या बैठकीबाबतची अधिकृत माहिती मिळाली असल्याचे ‘कर्नाटक राज्य शेतकरी संघ आणि हसीरू सेने’चे राज्याध्यक्ष चुनप्पा पुजारी यांनी स्पष्ट केले.
दसऱ्याच्या सणानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक पार पडणार असून, यामध्ये उसाच्या दराबाबतचा अंतिम तोडगा निघेल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता किंवा आघात न बाळगता शांतता राखावी, असे आवाहन चुनप्पा पुजारी यांनी केले आहे.


Recent Comments