बेळगाव येथील पोलीस परेड मैदानावर शहर व जिल्हा पोलिसांच्या वतीने ‘पोलीस हुतात्मा दिन’ सन्मानपूर्वक पाळण्यात आला.


बेळगावच्या पोलीस परेड मैदानावर झालेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, आयजीपी संदीप, पोलीस अधीक्षक के. रामराजन आणि शहर पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच हवेत तीन फेऱ्या गोळ्या झाडून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर पोलिसांना श्रद्धांजली वाहण्यात आली.



यावेळी बोलताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी, गेल्या अडीच वर्षांत जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावताना पोलीस विभागाकडून उत्तम सहकार्य लाभल्याचे सांगितले. खाकीचे महत्त्व अधोरेखित करताना, “खाकी का हर धागा एक कहानी कहता है, यह वर्दी नहीं केवल जनता का विश्वास है,” या शायरीच्या माध्यमातून त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या निष्ठा आणि कर्तव्याचा गौरव केला.

पोलीस दलाच्या अहोरात्र पहिऱ्यामुळे आणि सतर्कतेमुळेच नागरिक सुरक्षित राहू शकतात, असे सांगत जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या योगदानाची प्रशंसा केली. देशाच्या व समाजाच्या शांततेसाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्मा जवानांच्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा सन्मान करणे तसेच त्यांच्या बलिदानाचे स्मरण ठेवणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments