Belagavi

बेळगावात उत्साहात साजरा झाला पारंपरिक दसरा उत्सव

Share

ऐतिहासिक आणि संस्कृती वारसा लाभलेल्या बेळगावमध्ये विजयादशमी आणि सीमोल्लंघन सोहळा अत्यंत सलोख्याने आणि उत्साहात पार पडला. शहरातील मराठी विद्यानिकेतन मैदानावर देवस्थान समितीच्या वतीने शमी पूजन करून दसरा उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.

बेळगाव शहराच्या विविध भागांतून आलेल्या सर्व देवदेवतांच्या पालख्या एकाच ठिकाणी एकत्र आल्याने सीमोल्लंघन सोहळ्याची शोभा वाढली. मराठी विद्यानिकेतन मैदानावर शहर देवस्थान समितीचे अध्यक्ष रणजित चव्हाण – पाटील आणि समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते धार्मिक विधींनुसार शमी पूजन संपन्न झाले.

राज्यात निर्माण झालेले दुष्काळाचे संकट दूर व्हावे आणि समृद्ध पाऊस पडावा अशी प्रार्थना श्री दुर्गादेवीच्या चरणी केली असल्याचे रणजित चव्हाण पाटील यांनी सांगितले.

कोलकातानंतर बेळगाव शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात विजयादशमी साजरी केली जाते. ज्योतिबाच्या सासनकाठ्यांसह येणारे भाविक पूजनानंतर परस्परांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देतात, ही येथील ऐतिहासिक परंपरा असल्याचे किरण जाधव यांनी स्पष्ट केले.

म्हैसूरनंतर देशात अत्यंत उत्साहाने दसरा साजरा करणारे बेळगाव हे सुंदर शहर असून ही दुर्मीळ संस्कृती जपणाऱ्या जनतेचे माजी आमदार अनिल बेनके यांनी अभिनंदन केले.

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक खर्च टाळून काटकसरीने सण साजरा करावा आणि या कठीण परिस्थितीचा एकजुटीने सामना करावा, असे आवाहन रमाकांत कोंडुस्कर यांनी केले.

बेळगावकरांना दसरा सणाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन येणारे वर्ष प्रत्येकासाठी शांतता, समाधान आणि प्रगती घेऊन येवो अशी आशा पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी व्यक्त केली.

या सोहळ्यास देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी, आजी – माजी लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी, 18 गल्ल्यांचे पंच, प्रमुख आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: