तीव्र दुष्काळी परिस्थिती असतानाही दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. शहरातील काकतीवेस भागात दसरा पूजेसाठी लागणारे ऊस, फुले आणि आपट्याची पाने खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू आहे.

काकतीवेस बाजारात उसाची जोडी ४० रुपयांना तर फुलांची विक्री ३० ते ५० रुपये दराने होत आहे. सणानिमित्त ग्राहक खरेदीसाठी येत असले, तरी गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा दर कमी करण्यासाठी ग्राहक व्यापाऱ्यांशी मोलभाव करताना दिसत आहेत.

दुष्काळामुळे निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईचा फटका सर्वसामान्यांना बसला असून नागरिक अत्यंत काटकसरीने खरेदी करत आहेत. ग्राहक कमी दरात वस्तू मिळवण्यासाठी आग्रही असल्याने अपेक्षित नफा मिळणे कठीण झाल्याची खंत व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
एकीकडे दसऱ्याचा उत्साह आणि दुसरीकडे दुष्काळाचे सावट, अशा वातावरणात काकतीवेस भागातील व्यापारी सणाच्या उलाढालीत व्यस्त आहेत. ग्राहकांच्या खरेदी उत्साहाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दसऱ्यात अपेक्षित उत्पन्न मिळेल का, असा प्रश्न व्यापाऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे.


Recent Comments