सांस्कृतिक नगरी बेळगाव येथे श्री दुर्गामाता दौड अत्यंत उत्साहात आणि विनाविघ्न पार पडली. जुना बेळगाव आणि खसबाग भागातून सुरू झालेल्या या दौडमध्ये हजारो युवक-युवती, महिला आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत धर्म व देशप्रेमाची भावना जागृत केली.

खसबाग येथून महामंगला आरती आणि प्रणा मंत्रासह ध्वजारोहण करून दौडला अधिकृत सुरुवात झाली. ही दौड खसबागचे प्रमुख मार्ग, वडगाव सोनार गल्ली, बाजार गल्ली, रामदेव गल्ली, वाझे गल्ली, विष्णू गल्ली, कारभार गल्ली, पाटील गल्ली, आनंद नगर आणि यरमाळ रस्ता या मार्गावरून मार्गस्थ झाली. मार्गावर महिलांनी काढलेल्या आकर्षक रांगोळ्या आणि पुष्पवृष्टीमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

यावर्षीच्या दौडमध्ये पाच हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग लक्षणीय ठरला. मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत सहभाग घेत उपस्थितांचे मन जिंकले. मोबाईलपासून दूर राहून आपली संस्कृती, इतिहास आणि संस्कार जपण्याचा संदेश या दौडच्या माध्यमातून देण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि देशप्रेमाची प्रेरणा मनात ठेवून अशा कार्यक्रमांचे आयोजन सतत केले जावे, असा संदेश यावेळी देण्यात आला. ही दौड वडगाव मंगाई नगर येथील श्री मंगाई मंदिरात पोहोचली, जिथे देवीची विशेष पूजा करून आणि ध्येय मंत्राचे पठन करून यावर्षीच्या दुर्गामाता दौडची यशस्वी सांगता झाली.

दरम्यान, शनिवार दिनांक रोजी बेळगावच्या छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज चौकापासून सुरू होणारी पुढील दौड विविध मार्गांनी प्रवास करून संयुक्त महाराष्ट्र चौक, खडे बाजार येथे येऊन समाप्त होणार आहे.



Recent Comments