Vijayapura

तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शनावरून नवा वाद

Share

महाराष्ट्रातील प्रसिद्ध शक्तीपीठ तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शनावरून नवा वाद निर्माण झाला आहे. सामान्य भाविकांना गाभाऱ्यात प्रवेशबंदी असताना एका व्यक्तीला विशेष प्रवेश देऊन फोटोशूटची परवानगी दिल्याचा आरोप झाला आहे. याप्रकरणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी चौकशीचे निर्देश दिले आहेत.

नवरोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शनाचा वाद समोर आला आहे. सोलापूरचे अरुण प्रभाकर रोडगे ऊर्फ दादा रोडगे या व्यक्तीला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश देऊन फोटोशूटची मुभा देण्यात आल्याचा आरोप आहे. सामान्य भाविक तासंतास रांगेत उभे असताना एका व्यक्तीला अशी विशेष परवानगी कशी काय दिली गेली, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

या घटनेप्रकरणी श्री तुळजाभवानी भोपी-पुजारी मंडळाने जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानाच्या अध्यक्षांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. गाभाऱ्यात प्रवेश कुणी दिला, कोणत्या परवानगीच्या आधारे फोटोशूट झाले आणि यात मंदिर प्रशासनातील कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे व्हीआयपी दर्शन व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. या चौकशीनंतरच नियमांचे उल्लंघन झाले आहे का आणि यात कोणाचा सहभाग आहे हे स्पष्ट होणार आहे.

विजयकुमार सारवाड,
इन न्यूज,
विजापूर

Tags: