सोमवारी बेळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात भटक्या कुत्र्यांना अन्न देण्यासाठी विशिष्ट जागा निश्चित करण्याबाबत एका विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

या वेळी उपस्थितांना संबोधित करताना महापौर म्हणाल्या की, प्रत्येक वॉर्डातून कुत्र्यांच्या उपद्रवाबाबत तक्रारी येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कुत्र्यांना अन्न देण्यासाठी ठराविक जागा निश्चित करणे गरजेचे असून त्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, असे महापौर प्रीती कामकर यांनी सांगितले. बेळगाव शहरातील प्रत्येक वॉर्डातून भटक्या कुत्र्यांचा त्रास वाढल्याच्या तक्रारी नागरिकांकडून येत असून या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन महापौर प्रीती कामकर यांनी केले.


या वेळी उपमहापौर हणमंत कोंगाळी म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कुत्र्यांसाठी फिडिंग स्पॉट्स निश्चित करावे लागतील. कुत्रे जन्मतः हिंस्त्र नसतात, परंतु अनोळखी व्यक्तींच्या वर्तनामुळे ते आक्रमक होतात. काही खरोखरच हिंस्त्र कुत्र्यांची ओळख पटवून त्यांनी चावा घेण्यामागची कारणे शोधणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया उपमहापौर हणमंत कोंगाळी यांनी दिली.
कचरा व्यवस्थापन आणि नसबंदी मोहीम राबवूनही कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. नागरिक याबद्दल महानगरपालिका आणि प्राणीदया संस्थांना दोष देतात. परंतु मानव आणि प्राणी दोघेही सुरक्षितपणे एकत्र राहू शकतील, असा मार्ग या कार्यशाळेच्या माध्यमातून काढायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महानगरपालिका अधिकारी कार्तिक एम. यांनी सांगितले की, महानगरपालिकेकडून भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. कुत्र्यांना अन्न देण्याच्या जागांबाबत या कार्यशाळेत चर्चा करून योग्य तोडगा काढला जाईल, असे त्यांनी सांगितले.
या कार्यशाळेला आरोग्य स्थायी समितीचे अध्यक्ष राजू भातकांडे, महानगरपालिका अधिकारी कलादगी, तसेच श्वानप्रेमी आणि प्राणीदया संस्थेचे सदस्य उपस्थित होते.


Recent Comments