Belagavi

आम. प्रदीप ईश्वर यांच्या विधानाविरोधात बेळगावात तीव्र निदर्शने

Share

उत्तर कर्नाटकच्या भाषेविषयी चिक्कबळ्ळापूरचे काँग्रेस आमदार प्रदीप ईश्वर यांनी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत उत्तर कर्नाटक संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी बेळगाव येथील चन्नम्मा चौकात जोरदार निदर्शने केली.

उत्तर कर्नाटकची भाषा, संस्कृती, परंपरा आणि प्रादेशिक अस्मितेविषयी बेजबाबदार वक्तव्य केल्याने या भागातील जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचे आंदोलकांनी सांगितले.

उत्तर कर्नाटकला समृद्ध ऐतिहासिक वारसा आणि वैशिष्ट्यपूर्ण भाषेची परंपरा आहे. लोकप्रतिनिधींनी प्रादेशिक भाषेचा आदर राखणे कर्तव्य असताना, लोकप्रतिनिधींकडूनच भाषेची हेटाळणी होणे अयोग्य असल्याची टीका समितीच्या नेत्यांनी केली.

भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून ते येथील जनतेचे जीवन, संस्कृती आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे भाषेची चेष्टा सहन केली जाणार नाही, असा इशारा देत लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वक्तव्ये करावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली.

चन्नम्मा वर्तुळात जमलेल्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रदीप ईश्वर यांच्याविरोधात घोषणाबाजी करत उत्तर कर्नाटकच्या भाषेचा आणि संस्कृतीचा आदर राखला जावा, अशी मागणी लावून धरली.

Tags: