hubali

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचे हुबळीत आंदोलन

Share

मुख्य निवडणूक आयुक्त यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा, या मागणीसाठी हुबळी-धारवाड शहर जिल्हा गॅरंटी योजना कार्यान्वयन प्राधिकरणाचे अध्यक्ष रजत उळागड्डीमठ यांच्या नेतृत्वाखाली विद्यानगर आणि उणकल ब्लॉक काँग्रेस समितीच्या वतीने हुबळीत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला.

शहरातील डॉ. बी. आर. आंबेडकर सर्कलपासून या निषेध मोर्चाला सुरुवात झाली. भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या सार्वत्रिक मतदानाच्या हक्काचा पुनरुच्चार करणाऱ्या संविधानातील कलम ३२६ चे जाहीर वाचन करून या आंदोलनाचा प्रारंभ करण्यात आला.

निषेध सभेला संबोधित करताना अध्यक्ष रजत उळागड्डीमठ म्हणाले, लोकशाहीच्या पायावर उभारलेल्या भारत देशात शोषित आणि पीडित घटकांचा पवित्र मतदानाचा हक्क हिरावून घेण्याचा कट रचला जात आहे. लोकशाही आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी ही दुसरी स्वातंत्र्यलढ्याची चळवळ आहे, अशी घणाघाती टीका रजत उळागड्डीमठ यांनी केली.

या आंदोलनात शेकडो काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. केंद्र सरकार मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनुसूचित जाती, जमाती आणि अल्पसंख्याक समाजाची मते बेकायदेशीरपणे हिरावून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

हा मोर्चा महानगरपालिका कार्यालयाच्या आवारात पोहोचताच संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांच्या पुतळ्याचे दहन करण्याचा प्रयत्न केला. या वेळी उपस्थित पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट होऊन काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

Tags: