बेळगाव जिल्ह्यात तीव्र दुष्काळ आणि आगामी काळात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने बागायती पिके वाचवण्यासाठी पावसाच्या पाण्याची साठवणूक करून ठिबक सिंचनाचा वापर करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन बागायत विभागाचे संयुक्त संचालक महांतेश मुरगोड यांनी केले.

कर्नाटक सरकारच्या बागायत विभागातर्फे बेळगाव येथील शेतकरी भवनात जिल्हास्तरीय ठिबक सिंचन योजनेअंतर्गत विभागीय तांत्रिक अधिकारी, शेतकरी, वितरक आणि उत्पादक कंपन्यांसाठी एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या वेळी बोलताना महांतेश मुरगोड म्हणाले की, जिल्ह्यातील सुमारे ६२ हजार हेक्टर क्षेत्रावरील फळे, भाजीपाला, मसाले पिके आणि नारळ यांसारखी बागायती पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर केला पाहिजे. पावसाचे पाणी साठवून ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे हाच यावरील प्रभावी उपाय आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमास बागायत विभागाचे उपसंचालक महादेव हिंडीहोळी, अरभावी येथील राणी चेन्नम्मा बागायत महाविद्यालयाचे डीन आनंद मास्तीहोळी, पशुसंवर्धन विभागाचे उपसंचालक रवी सालीगौडर, कृषी संयुक्त संचालक एच. डी. कोळेकर, जैन इरिगेशनचे प्रादेशिक व्यवस्थापक सचिन पाटील आणि सहायक बागायत अधिकारी अभिषेक कटगी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments