बेळगाव शहरात ‘मिशन ऑलिम्पिक गेम्स असोसिएशन’तर्फे २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय कुस्ती निवड चाचणी व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील सामर्थ्य व्यायाम मंदिरात होणाऱ्या या मॅट कुस्ती स्पर्धेत राज्यातील शेकडो मल्ल सहभागी होणार असून, विजेत्यांची उज्जैन येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली जाणार आहे.

बेळगावचे डीसीपी नारायण बरमणी यांच्या हस्ते या स्पर्धेच्या पत्रकाचे अनावरण करण्यात आले. या वेळी बोलताना डीसीपी नारायण बरमणी यांनी स्पर्धेत ४०० हून अधिक कुस्तीपटू सहभागी होणार असल्याचे सांगितले. मुला-मुलींसाठी विविध वयोगटांत तसेच ओपन गटात होणाऱ्या या स्पर्धेतील विजेते मध्यप्रदेशातील उज्जैन येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत कर्नाटक राज्याचे प्रतिनिधित्व करतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कुस्तीपटू अतुल शिरोळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडर-९, १४, १७, १९ आणि वरिष्ठ ओपन गटात विविध वजनी गटांत मॅट कुस्तीचे सामने होतील. ७ ऑक्टोबर ते २२ ऑक्टोबरदरम्यान ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू राहणार आहे. ग्रामीण खेळ असलेल्या कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



Recent Comments