Belagavi

राहुल गांधी यांच्या अटकेविरोधात बेळगावात युवा काँग्रेसचे तीव्र आंदोलन

Share

बेळगावात आज युवा काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली. फॉर्म ७ चा गैरवापर आणि मतदार यादीतून बेकायदेशीरपणे नावे वगळल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.

बेळगाव जिल्हा युवा काँग्रेस समितीच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवनापासून राणी चन्नम्मा चौकापर्यंत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. दिल्लीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाला या वेळी पूर्ण पाठिंबा दर्शवण्यात आला. दिल्लीत आंदोलनकर्त्यांशी पोलिसांनी केलेल्या असभ्य वर्तनाचा नेत्यांनी तीव्र निषेध केला.

युवा काँग्रेसचे नेते राहुल जारकीहोळी यांनी संपूर्ण देशात एसआयआर प्रक्रिया आणि फॉर्म ७ चा गैरवापर करून मतदार यादीतून नावे वगळण्याचा मोठा कट रचल्याचा गंभीर आरोप केला. देशभरात १३ कोटींहून अधिक तर एकट्या कर्नाटकात १ कोटींहून अधिक मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. विशेषतः काँग्रेसचे प्राबल्य असलेले बूथ, अनुसूचित जाती, जमाती, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय मतदारांना लक्ष्य करून नावे हटवली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

निवडणूक आयोग स्वतंत्रपणे काम न करता केंद्र सरकारचे बाहुले बनले आहे, असा टोला लगावत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी नेत्यांनी केली. ईडी आणि सीबीआयप्रमाणेच आता निवडणूक आयोगही काम करत असून राष्ट्रपतींनी त्वरित हस्तक्षेप करून आयुक्तांना बडतर्फ करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच राज्यभरात हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

या वेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: