Athani

अथणीतील रणवीर हत्या प्रकरणाचा छडा

Share

अथणी तालुक्यातील बल्लीगेरी गावात घडलेल्या रणवीर हत्या प्रकरणाचा बेळगाव जिल्हा पोलिसांनी यशस्वीरीत्या छडा लावला आहे. अनैतिक संबंधातून महिलेने आपल्या जुन्या शाळकरी मित्राच्या मदतीने प्रियकराची हत्या घडवून आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा पोलिस अधीक्षक के. रामराजन यांनी ही माहिती दिली. मृत रणवीर आणि आरोपी श्रीदेवी यांच्यात अनैतिक संबंध होते. आरोपी श्रीदेवीने तिचा जुना शाळकरी मित्र भैरू श्रीमंत पवार याच्यासोबत मिळून रणवीरच्या हत्येचा कट रचला. २१ सप्टेंबर रोजी रात्री घरात कोणी नसल्याची संधी साधून भैरू पवार बल्लीगेरी येथे आला. त्याने दुचाकी सुरू होत नसल्याचे सांगून रणवीरला घराबाहेर बोलावले आणि त्याचा गळा आवळून खून केला.

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलिस अधीक्षक के. रामराजन, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आर. बी. बसरगी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत मुन्नोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. अथणीचे पोलिस निरीक्षक संतोष हळ्ळूर आणि पोलिस उपनिरीक्षक गिरीमल्लप्पा उप्पार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शिताफीने कारवाई करत पसार झालेल्या दोन्ही आरोपींना अटक केली. या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा उलगडा करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

Tags: