मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेत राजकीय हेतूने अल्पसंख्याक आणि दलित समाजातील मतदारांची नावे पद्धतशीरपणे वगळली जात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. याप्रकरणी ते उद्या स्वतः निवडणूक आयोगाची भेट घेऊन पुरावे सादर करणार आहेत.

मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत भाजप नेत्यांच्या सूचनेनुसार फॉर्म-७ चा गैरवापर करून नावे वगळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची गुन्हेगारी स्वरूपाची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात उद्या आपण स्वतः निवडणूक आयोगाची भेट घेऊन सर्व पुरावे सादर करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात सुरू असलेल्या मतदार यादी विशेष पुनरीक्षण प्रक्रियेवर चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्र्यांनी, नागरिकांच्या मतदानाच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. राज्यात आधीच १ कोटीहून अधिक मतदार कमी झाले असून ५० लाखांहून अधिक लोकांना नोटिसा बजावण्यात आल्याच्या मुद्द्यावर त्यांनी लक्ष वेधले. मतदारांच्या हक्कांचे रक्षण करणे हे आपले मुख्य कर्तव्य असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
भाजप नेते आपल्या हायकमांडच्या सांगण्यावरून काँग्रेस आमदारांच्या मतदारसंघांमध्ये अल्पसंख्याक आणि दलितांची नावे हटवत असल्याचा दावा त्यांनी केला. या गैरप्रकाराबाबत ठोस पुरावे उपलब्ध असल्याचे सांगत, नागरिकांनी यासंबंधीची कोणतीही माहिती असल्यास ती तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवावी, असे आवाहन मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केले.


Recent Comments