Belagavi

राहुल गांधींचा ‘वोटींग चोरी’चा दावा हास्यास्पद: जगदिश शेट्टर

Share

निवडणूक जिंकता येत नसल्याने केंद्रीय विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मतदार चोरीचा आरोप करत आहेत, जो अत्यंत हास्यास्पद आहे. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना सत्तेची मस्ती चढली आहे, अशी खरमरीत टीका माजी मुख्यमंत्री तथा खासदार जगदिश शेट्टर यांनी केली आहे.

बेळगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खासदार शेट्टर यांनी निवडणूक आयोगाच्या मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेवर विरोधकांकडून होणाऱ्या टीकेचा तीव्र निषेध केला. देशात सतत पराभव स्वीकारावा लागत असलेल्या काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांनी पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न चालवला आहे. मतदार यादीतून मृत आणि बोगस नावे वगळण्याच्या सामान्य प्रक्रियेला राहुल गांधी मतदार चोरी म्हणत असून, ही त्यांची राजकीय अपरिपक्वता आहे, असे त्यांनी सांगितले.

या वेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावरही ताशेरे ओढले. राज्यातील तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली असून हमी योजनांच्या नावाखाली विकासकामे ठप्प झाली आहेत. ठेकेदारांची हजारो कोटी रुपयांची बिले थकली असून, त्याकडे लक्ष देण्यास सरकारकडे वेळ नाही, असा आरोप त्यांनी केला.

वीरशैव मठाधीशांबद्दल वक्तव्ये करणे हे मुख्यमंत्र्यांच्या अहंकाराचे प्रतीक आहे, असे सांगत त्यांनी मठाधीशांची माफी मागावी, अशी मागणी केली. तसेच अल्पसंख्याकांच्या अनुनयासाठी विधानसौधमध्ये उर्दू उत्सव साजरा करण्याच्या निर्णयाचा निषेध करत, धर्मांमध्ये फूट पाडणारे असे प्रकार तात्काळ थांबवावेत, असा इशारा त्यांनी दिला.

पत्रकार परिषदेला भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, शहर अध्यक्षा गीता सुतार, माजी आमदार संजय पाटील आणि महांतेश कवटगीमठ उपस्थित होते.

Tags: