सेवा संकल्प हा केवळ भाजपचा पक्षीय कार्यक्रम नसून तो संपूर्ण देशाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकाने गावपातळीवर विविध सेवाकार्यांच्या माध्यमातून यात सहभागी व्हावे, असे आवाहन उत्तर कन्नडचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी केले.

खानापूर तालुक्यातील नंदगड येथील बसप्पा अरगावी कल्याण मंडपात आयोजित सेवा संकल्प अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.

आपल्या भागात वृक्षारोपण करणे, अंगणवाडीतील बालकांसाठी उपक्रम राबवणे, गरजूंना मदत करणे आणि अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून देणे हीच खरी सेवा असल्याचे सांगत सर्वांनी या अभियानाला पाठबळ द्यावे, असे खासदार कागेरी म्हणाले.

या वेळी माजी आमदार तथा बीडीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात सुवर्णकाळ सुरू असल्याचे सांगत सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचत असल्याचे स्पष्ट केले.

कार्यक्रमादरम्यान खासदार कागेरी आणि माजी आमदार अरविंद पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी तालुका मार्केटिंग सोसायटीचे संचालक रफिक हलशीकर यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
* अल्ताफ एम. बसरीकट्टी, इन न्यूज, खानापूर.


Recent Comments