Khanapur

खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी

Share

खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवाव्यात या मागणीसाठी सोमवारी लिंगनमठ क्रॉस येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

अखिल कर्नाटक शेतकरी संघ, राज्य शेतकरी संघ हसिरू सेना आणि विविध संघटनांच्या संयुक्त विद्यमाने बेळगाव-ताळगुप्पा आणि रामनगर-धारवाड राज्य महामार्गावर हे आंदोलन पार पडले. खानापूर, कित्तूर, आळनावर आणि हळियाळ तालुक्यातील शेतकरी व व्यापारी यामध्ये सहभागी झाले होते.

तालुक्यात दुष्काळ जाहीर करून प्रति एकर २५ हजार रुपये भरपाई द्यावी, उसाला प्रति टन ६ हजार रुपये दर मिळावा, पूर्ण कर्जमाफी व्हावी, तसेच मलमप्रभा नदीवर धरण बांधून सिंचन व पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. याशिवाय वीज खाजगीकरण रद्द करून दररोज ७ तास थ्री-फेस वीज द्यावी आणि तालुक्यातील ८३० किलोमीटर रस्त्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणीही करण्यात आली.

या आंदोलनाला पाठिंबा देताना अवरोळी-बिळकी रुद्रस्वामी मठाचे चन्नबसवा देवरू यांनी येत्या आठ दिवसांत खानापूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. जर आठ दिवसांत मागणी पूर्ण झाली नाही तर शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहून तीव्र संघर्ष करू, असे चन्नबसवा देवरू यांनी म्हटले.

तहसीलदार दुंडप्पा कुमार यांनी आंदोलनस्थळी पोहोचून शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा अहवाल सरकारकडे पाठवला जाईल, असे स्पष्ट केले.

या आंदोलनात हिडकलीचे प्रभु अडविसिद्धेश्वर महास्वामीजी, तोलगीचे अदृश्यानंद महास्वामीजी, शेतकरी संघाचे राज्य उपाध्यक्ष किशोर मिठारी, नंदगड मार्केटिंगचे अध्यक्ष श्रीशैल माटोळी, लिंगनमठ ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष काशीम हट्टीहोळी यांच्यासह अनेक शेतकरी नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: