परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजींच्या संदेशानुसार, निवृत्त कृषी अधिकारी बिरादार यांच्या नेतृत्वाखाली ‘नंदी कूगु’ अभियानाद्वारे गावांमध्ये बैल संगोपनासाठी राज्य सरकारने दरमहा ११ हजार रुपयांचे अनुदान द्यावे, या मागणीसाठी कागवाड येथील शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह तहसीलदार कार्यालयावर जाऊन राज्य सरकारला निवेदन दिले.


गुरूवारी कागवाड नगरपंचायतीच्या सभागृहाजवळ बैल आणि बैलगाड्यांसह एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी मुख्य मार्गावरून मिरवणूक काढत राणी चन्नम्मा चौकामार्गे तहसीलदार रवींद्र हादिमनी यांना निवेदन सादर केले.

बैलजोडी शेती संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी कायदा करावा आणि बैलजोडीने शेती करणाऱ्या शेतकऱ्याला दरमहा ११ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे शेतकरी नेते अरुण जोशी यांनी सांगितले. बैलांच्या नांगराने नांगरणी करून जमिनीची सुपीकता जपणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार करून सरकारने विशेष योजना आखावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

बैलजोडीने शेती करणाऱ्यांची संख्या घटत असल्याने पारंपारिक कृषी संस्कृती नष्ट होण्याचा धोका आहे, त्यामुळे राज्य अर्थसंकल्पात १० टक्के निधी राखून ठेवण्याचा कायदा करावा, असे निवृत्त मुख्याध्यापक व शेतकरी महादेव उदगावे यांनी सांगितले. तर प्रगतशील शेतकरी व वकील काका पाटील यांनी बैलजोडी शेती करणाऱ्यांना मासिक ११ हजार रुपये प्रोत्साहन भत्ता, बियाणे व खतांवर अनुदान देऊन सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी केली. अशोक चौगुले, बापू मालगावे आणि बाहुबली ठोत यांनीही आपल्या समस्या तहसीलदारांसमोर मांडल्या.
शेतकऱ्यांच्या या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारकडे पाठवण्याचे आश्वासन तहसीलदार यांनी दिले. यावेळी पीएसआय राघवेंद्र खोत, दादा पाटील, विजय साळुंखे, आप्पासाहेब चुन्नापुगोळ यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.


Recent Comments