शेती क्षेत्रात आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर वाढत असताना, विजापूर जिल्ह्यातील होनवाड येथे बैलांच्या जोडीने अवघ्या १० तास ३० मिनिटांत तब्बल ३६ एकर शेत नांगरून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तिकोटी तालुक्यातील होनवाड येथील शेतकरी महेश वडेयर यांच्या शेतात ही नांगरणी झाली. पारंपरिक शेतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दानय्या गुगवाड यांच्या बैलजोडीने सलग काम करत हा विक्रम केला. सकाळी सुरू झालेले हे काम सलग १० तास ३० मिनिटे चालले.

बैलांची ताकद, त्यांना दिलेले प्रशिक्षण आणि शेतकऱ्यांचे कौशल्य यांमुळेच एवढ्या कमी वेळेत एवढ्या मोठ्या क्षेत्राची नांगरणी शक्य झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
आजच्या आधुनिक युगात ट्रॅक्टर आणि यंत्रांचा बोलबाला असताना बैलांच्या साहाय्याने झालेली ही कामगिरी पाहून ग्रामस्थांनी कौतुक केले. या पराक्रमामुळे पारंपरिक शेतीचे महत्त्व आणि शेतकऱ्यांचे कष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
या नांगरणीच्या कामात बसवराज सरस्वती, प्रवीण कलघटगी, नागू सिद्धनाथ, सुनील गुगवाड, बसवराज हंजी, ज्ञानेश्वर जाधव आणि पिंटू सिद्धनाथ यांच्यासह अन्य ग्रामस्थ सहभागी झाले होते.


Recent Comments