Vijayapura

विजापूरच्या नागठाणमध्ये जोकुमार उत्सवाचा उत्साह

Share

गणेशोत्सवानंतर उत्तर कर्नाटकातील ग्रामीण भागात साजरा केल्या जाणाऱ्या जोकुमार उत्सवाला सुरुवात झाली आहे.

विजापूर तालुक्यातील नागठाण गावात उत्तम पीकपाण्यासाठी महिला घरोघरी जोकुमारची मूर्ती नेऊन पारंपारिक लोकगीते गात ही अनोखी परंपरा साजरी करतात .. गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी जोकुमारचा जन्म होतो, अशी ग्रामीण भागात मान्यता आहे. नागठाण गावात वर्षानुवर्षे चालत आलेल्या या परंपरेत महिला वेताच्या टोपलीत कडुलिंबाच्या पानांनी झाकलेली जोकुमारची मातीची मूर्ती घेऊन घरोघरी जातात. जोकुमार हा शब्द काळाच्या ओघात लोप पावत जोखमार असा देखील काही भागात उच्चार केला जातो. या मूर्तीला घरोघरी नेऊन महिला लोकगीते गातात.

जोकुमार दाराशी आल्यावर गृहिणी लोणी, तेल, मीठ, चिंच आणि विविध धान्य अर्पण करतात. घरात सुख-शांती नांदावी आणि शेतात उत्तम पीक पाण्यासाठी जोकुमारकडे प्रार्थना केली जाते. या निमित्ताने गायली जाणारी लोकगीते ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपत आहेत.

काळाच्या ओघात अनेक चालीरीती बदलल्या असल्या तरी नागठाणमधील ही लोकपरंपरा आजही टिकून आहे. हा दुर्मिळ सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत असाच पुढे जावा, अशी भावना स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

विजयकुमार सारवाड
इन न्यूज, विजापूर.

Tags: