जागतिक बांबू दिनानिमित्त खानापूर वन उपविभागाचे साहाय्यक वनसंरक्षक बसवराज वाळद यांनी पर्यावरण संतुलनात बांबूचे महत्त्व पटवून देत नागरिकांना बांबू लागवडीचे आवाहन केले.


बांबू केवळ वनस्पती नसून निसर्गाच्या संतुलनाची किल्ली आहे, असे सांगताना त्यांनी मातीची धूप रोखणे, भूजल पातळी वाढवणे, हवा शुद्धीकरण आणि जैवविविधतेच्या संरक्षणात बांबूची भूमिका महत्त्वाची असल्याचे स्पष्ट केले. बांबूला हत्ती, गवा, हरिण यांसारखे प्राणी अन्नासाठी वापरतात, तसेच मानवी दैनंदिन गरजा आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेतही त्याचे स्थान मोठे आहे. बांबू ४० ते ६० वर्षे जगून शेवटी फुले आल्यावर नष्ट होतो, असेही त्यांनी सांगितले. शाळा, घरे व कार्यालयांच्या परिसरात बांबू लावून प्लास्टिकला पर्याय म्हणून त्याचा वापर वाढवण्याचे आवाहन त्यांनी केले.

या वेळी लोंढा क्षेत्राचे वनसंरक्षक मृत्युंजय गणाचारी, उपवनसंरक्षक विश्वनाथ मंगळगट्टी आणि वन कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments