Khanapur

हिरेमुनवळ्ळी श्री महालक्ष्मी यात्रेची पूर्वतयारी बैठक संपन्न

Share

खानापूर तालुक्यातील हिरेमुनवळ्ळी गावात तब्बल २८ वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर, म्हणजेच एप्रिल २०२७ मध्ये होणाऱ्या ऐतिहासिक श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर नुकतीच गावातील ऐतिहासिक कलमेश्वर मंदिरात पूर्वतयारी बैठक पार पडली.

सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी श्रीनिवास कुलकर्णी होते. आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरेमुनवळ्ळी येथे २८ वर्षांनंतर होणाऱ्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी बैठक पार पडली. या वेळी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेत आमदारांनी रस्ते दुरुस्ती, सुरळीत वीजपुरवठा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देत, यात्रेसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले.

यात्रेदरम्यान सर्व सरकारी विभागांनी समन्वयाने काम करावे आणि भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, असे आवाहन आमदारांनी केले. तसेच गावातील ऐतिहासिक उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकजुटीने काम करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. मागील अनुभवातून शिकून यंदाची यात्रा अत्यंत शिस्तबद्ध व थाटामाटात पार पाडण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थ व यात्रा कमिटीला केले.

या बैठकीला अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, यात्रा कमिटीचे ज्येष्ठ नेते अशोक पाटील यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Tags: