Chikkodi

बेळगाव जिल्हा तात्काळ ‘दुष्काळग्रस्त’ घोषित करा: महांतेश कवटगीमठ यांची मागणी

Share

बेळगाव जिल्ह्यात पावसाच्या तीव्र तुटवड्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून राज्य सरकारने संपूर्ण जिल्ह्याला तात्काळ ‘दुष्काळग्रस्त’ घोषित करावे, अशी जोरदार मागणी विधान परिषदेचे माजी मुख्य प्रतोद महांतेश कवटगीमठ यांनी केली आहे.

चिक्कोडी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी जिल्ह्यातील कृषी आणि दुष्काळी परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली. बेळगाव जिल्ह्यात ९८ टक्के पेरण्या झाल्या असल्या तरी सरासरीपेक्षा २९ टक्के पाऊस कमी झाला आहे. यामुळे मूग, उडीद, सोयाबीन, कापूस आणि बाजरीची पिके वाळून गेली असून उत्पन्नात ५० टक्क्यांहून अधिक घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील सुमारे २ लाख हेक्टरवरील बागायती पिकांचे पावसाअभावी मोठे नुकसान झाले आहे. तसेच पावसाच्या तुटवड्यामुळे मुख्य नगदी पीक असलेल्या उसावर हुमणी किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. कृषी मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ पाहणी करून ऊस उत्पादकांना मदत करावी. राज्य सरकारने सुस्त न राहता शेतकऱ्यांना पीक नुकसानभरपाई द्यावी, पिण्याच्या पाण्याची सोय करावी आणि विशेष दुष्काळ पॅकेज जाहीर करावे, असे ते म्हणाले. या वेळी अमृत कुलकर्णी, संजय पाटील, शांभवी अश्वथपूर, पवन महाजन, रावसाहेब कमते, बाबासाहेब केंचन्नवर, राजशेखर खणदाळे, राजू हरगन्नवर उपस्थित होते.

Tags: