Vijayapura

विजापूरमध्ये सुक्या द्राक्षांचे ऑनलाइन मार्केटिंग, व्यवहारात मोठी वाढ

Share

विजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुक्या द्राक्षांच्या ऑनलाइन व्यापाराला सुरुवात झाली असून, मध्यस्थांची साखळी मोडीत निघाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.

राज्यात सर्वाधिक द्राक्ष उत्पादन घेणाऱ्या विजापूर जिल्ह्यात सुक्या द्राक्षांच्या बाजारात डिजिटल पद्धतीचा वापर सुरू झाला आहे. पूर्वी खाजगी व्यापाऱ्यांच्या लिलावात होणाऱ्या गैरप्रकारांमुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत नव्हता. यावर तोडगा काढण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी आणि द्राक्ष उत्पादकांची बैठक झाली. या बैठकीत आठवड्यातून दोन दिवस अनिवार्यपणे ऑनलाइन पद्धतीनेच व्यवहार करण्याचा निर्णय घेण्यात आला. ११ ऑगस्ट रोजी झालेल्या ऑनलाइन लिलावात द्राक्षांची आवक आणि व्यवहार दोन्ही वाढले.

पूर्वी अवघा २.१७ लाख किलो असलेला व्यवहार वाढून ६.८६ लाख किलोवर पोहोचला आहे. यामुळे बाजारातील एकूण व्यवहार ५ कोटी रुपयांवरून थेट १६ कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. सुक्या द्राक्षांना प्रति किलो २७० रुपयांवरून ४०३ रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. तसेच खरेदीदारांची संख्या १४ वरून २५, तर दलालांची संख्या २३ पर्यंत पोहोचली आहे.

आता दर मंगळवारी आणि शनिवारी ऑनलाइन ट्रेडिंग केले जात आहे. या ऑनलाइन व्यवस्थेमुळे करचोरीला आळा बसला असून, शासनाच्या तिजोरीत सेस आणि जीएसटीच्या रूपाने महसूल जमा होत आहे. दलालांच्या मध्यस्थीला चाप बसल्याने शीतगृह कर्मचारी आणि शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. असे शेतकऱ्यांनी म्हटले.

ऑनलाइन व्यापाराच्या या निर्णयामुळे विजापूर जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, शेतकरी या नव्या व्यवस्थेचे स्वागत करत आहेत.

विजयकुमार सारवाड
इन न्यूज, विजापूर.

Tags: