Bellary

बळ्ळारीत ग्रामसभेत अधिकाऱ्यांची झाली गोची

Share

बळ्ळारी जिल्ह्यातील रारावी गावात आयोजित ग्रामसभेत दूषित पाणीपुरवठ्यावरून ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत अधिकाऱ्यांना थेट दूषित पाण्याची बाटली दाखवून जाब विचारला.

बळ्ळारी जिल्ह्यातील सिरगुप्पा तालुक्यातील रारावी गावात आयोजित ग्रामसभा सुरुवातीपासूनच वादळी ठरली. गावात गेल्या अनेक दिवसांपासून पुरवले जाणारे पिण्याचे पाणी अत्यंत दूषित असून त्यात किडे आढळत आहेत. या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी किडे असलेले पाणी बाटलीत भरून थेट ग्रामसभेत आणले आणि अधिकाऱ्यांच्या टेबलवर ठेवून प्रशासनाला धारेवर धरले.

ग्रामस्थांच्या या अचानक झालेल्या आक्रमक पवित्र्यामुळे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता (एईई) राहुल यांना नागरिकांनी घेराव घातला. अधिकाऱ्यांनी आधी हे पाणी पिऊन दाखवावे, अशी मागणी करत दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला. मे महिन्यातच ही समस्या आपल्या निदर्शनास आली होती, अशी कबुली एईई राहुल यांनी दिली.

पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येतील, तसेच पाण्याच्या टाक्या आणि पाईपलाईन स्वच्छ करून शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल, असे आश्वासन एईई राहुल यांनी दिले. पाण्यासाठी तसेच गावातील गटारे, रस्ते आणि रोजगार हमी योजनेच्या प्रलंबित कामांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

Tags: