Vijayapura

१२ वर्षांनंतर जन्मठेपेचा आरोपी विजापूर पोलिसांच्या जाळ्यात

Share

जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना तुरुंगातून फरार झालेला आणि १२ वर्षे पोलिसांना चकवा देणारा आरोपी अखेर विजापूर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

बोटांच्या ठशांमुळे त्याची खरी ओळख पटली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ येथील रहिवासी बसवराज पाटील याला २००९ मधील एका हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. २०१४ मध्ये विजापूर मध्यवर्ती कारगृहात असताना उपचारादरम्यान तो रुग्णालयातून फरार झाला होता. तो स्वतःची ओळख लपवून बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील सिद्धसमुद्र गावात शेती करत राहत होता.

गांधीचौक पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप तळकेरी यांनी तपासाची चक्रे फिरवत त्याला सिद्धसमुद्र येथून ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने स्वतःची ओळख नाकारण्याचा प्रयत्न केला. मात्र, हत्येच्या वेळी घेतलेल्या बोटांच्या ठशांची पडताळणी केली असता, त्याची खरी ओळख उघड झाली.

१२ वर्षे फरार असलेल्या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करणाऱ्या गांधीचौक पोलीस पथकाचे कौतुक होत आहे.

Tags: