विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथे ‘माझे रेशीम, माझा अभिमान’ अभियानांतर्गत रेशीम शेती तांत्रिक कार्यशाळा पार पडली. रेशीम उत्पादकांना आधुनिक शेती पद्धती आणि शासकीय योजनांबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.


जिल्हा पंचायत विजापूर, रेशीम विभाग आणि बसवन बागेवाडी तालुका पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील यात्री निवास येथे ‘माझे रेशीम, माझा अभिमान’ अभियानांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रोपट्याला पाणी घालून अधिकारी व मान्यवरांनी उपक्रमाचे उद्घाटन केले.

चित्रदुर्ग येथील आर.एस.आर.एस. शास्त्रज्ञ डॉ. परमेश नायक यांनी रेशीम शेती हा गृहउद्योग असून रोजगार निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतो, असे सांगितले. कमी भांडवलात चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी वैज्ञानिक व तांत्रिक पद्धतींचा अवलंब करावा, असा सल्ला त्यांनी दिला. अनुसूचित जाती, जमाती, महिला, अल्पभूधारक शेतकरी आणि दिव्यांगांसाठी सरकारच्या विविध योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेत शेतकऱ्यांनी रेशीम उत्पादन व तांत्रिक बाबींवर तज्ज्ञांशी संवाद साधला. यावेळी २०२६-२७ या वर्षातील योजनांची माहिती पत्रके वितरीत करण्यात आली.
रेशीम शेतकरी उत्पादक कंपनी विजापूरचे अध्यक्ष शंकरगौडा पाटील हे अध्यक्षस्थानी होते. सहाय्यक संचालक बी.वाय. बिरादार, सिद्धण्णा कल्लूर, केंद्रीय रेशीम मंडळाच्या वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक वासंती, शिवानंद नायकोडी यांसह अधिकारी उपस्थित होते. रेशीम विस्तार अधिकारी एस.आय. गोलगोंड यांनी स्वागत केले. तालुक्यातील शेकडो रेशीम उत्पादकांनी या कार्यशाळेत भाग घेतला.


Recent Comments