केंद्रीय तपास यंत्रणांच्या गैरवापरावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत ईडीच्या धाडी राजकीय सूडबुद्धीने पडल्याचा गंभीर आरोप केला.

बेंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांनाच लक्ष्य केले जात असून भाजप नेत्यांवर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित केला. या कारवाईविरोधात कायदेशीर आणि राजकीय मार्गाने लढा देऊन निष्कलंक बाहेर पडू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या राजकीय धाडींची शक्यता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आधीच वर्तवली होती. गेल्या १० वर्षांत देशभरात विरोधी पक्षांच्या नेत्यांना पद्धतशीरपणे लक्ष्य केले जात असून, या संदर्भात अनेक आजी-माजी आमदार आणि मंत्र्यांनी आपली भेट घेऊन चर्चा केल्याचे त्यांनी नमूद केले. परदेशात मायनिंग आणि ट्रेडिंग करण्याचा विचार असून गुंतवणुकीसाठी विविध देशांमध्ये चाचपणी सुरू आहे, मात्र अद्याप कोणतीही गुंतवणूक केलेली नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
धाडीदरम्यान जप्त करण्यात आलेली दोन कोटी रुपयांची रोकड ही आमच्याच मालकीची असून त्याचा अन्य कोणाशीही संबंध नाही, असा दावा त्यांनी केला. आमच्या कंपनीची वार्षिक उलाढाल २ हजार कोटी रुपयांची आहे, असे सांगत आमच्या कर्मचाऱ्यांचे वेतनच महिना १ लाख रुपये आहे; बाजारात गेल्यावर १ लाख रुपये सहज खर्च होतात, असे सतीश जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.


Recent Comments