विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ आणि तालीकोटी तालुके दुष्काळग्रस्त यादीतून वगळल्यावरून राजकीय वातावरण तापले आहे. आमदार अप्पाजी नाडगौडा आणि पालकमंत्री एम. बी. पाटील यांच्यात यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

आमदार अप्पाजी नाडगौडा यांनी पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री एम. बी. पाटील यांच्यावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. राजकीय द्वेषापोटी मुद्देबिहाळ व तालीकोटी तालुक्यांना दुष्काळी यादीतून वगळून शेतकऱ्यांवर अन्याय करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या दोन्ही तालुक्यांचा समावेश दुष्काळग्रस्त यादीत न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

आमदार नाडगौडा यांच्या आरोपांना उत्तर देताना मंत्री एम. बी. पाटील यांनी दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया पूर्णपणे शास्त्रीय आणि तांत्रिक निकषांवर आधारित असल्याचे स्पष्ट केले. पहिल्या टप्प्यात स्वतःच्या मतदारसंघाचाही समावेश नव्हता, असे सांगत त्यांनी हे आरोप फेटाळून लावले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश करण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, माजी आमदार ए. एस. पाटील नडहळ्ळी यांनीही नाडगौडा यांच्या भूमिकेवर टीका केली.
दुष्काळाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला हा वाद आता नेत्यांमधील वैयक्तिक राजकीय संघर्षाच्या वळणावर पोहोचला आहे.
विजयकुमार सारवाड
इन न्यूज
विजापूर


Recent Comments