विजापूर येथील श्री चिदंबरेश्वर मंदिरात श्री शिवचिदंबर महास्वामींच्या अप्रकाशित लीलाग्रंथ पठणाच्या ५० व्या वर्षाचा सुवर्ण महोत्सव ६ ते १३ सप्टेंबर दरम्यान साजरा करण्यात येणार असल्याची माहिती श्री चिदंबर सेवा समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी दिली.

पत्रकार परिषदेत माहिती देताना त्यांनी सांगितले की, आठ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात लोककल्याणासाठी ६ कोटी शिवचिदंबर नामजप, होम-हवन, धार्मिक परिषदा, संगीत कार्यक्रम, भजन, कीर्तन आणि महापुरुषांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. तसेच १२ सप्टेंबर रोजी श्री नंजणगूड राघवेंद्रस्वामी मठापासून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

समितीचे सचिव व्यंकटेश जोशी नंदवाडगी यांनी सांगितले की, ६ सप्टेंबर रोजी गोपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात होणार असून आमदार बसणगौडा पाटील यत्नाळ यांच्या हस्ते याचे उद्घाटन होईल. या महोत्सवात गाडगनहट्टीचे श्री गुरु चिदंबर दीक्षित गुरुजी, सवदत्तीचे श्री दंडपाणी दीक्षित गुरुमहाराज यांच्यासह विविध मठांचे मठाधीश, मंत्री एम. बी. पाटील, आमदार आणि खासदार सहभागी होणार आहेत.
या प्रसंगी १० सप्टेंबर रोजी विशेष महिला संमेलन होणार असून १२ सप्टेंबर रोजी सुवर्ण महोत्सवाची स्मरणिका प्रकाशित केली जाईल. पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष अंबादास जोशी, सदस्य राघवेंद्र जोशी, वेदमुर्ती शंकरभट अग्निहोत्री, व्ही. सी. कुलकर्णी, सी. के. पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments