Belagavi

उगार शुगर कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धक्का

Share

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील उगार शुगर कारखान्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाने अचानक बंदची नोटीस बजावली आहे. या कारवाईचा निषेध करत आणि नोटीस तात्काळ मागे घेण्याच्या मागणीसाठी उगार शुगर वर्कर युनियनतर्फे बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

कोगनोळी-कागवाड तालुक्यातील उगार खुर्द येथील अत्यंत प्रतिष्ठित आणि तब्बल ८५ वर्षांची परंपरा असलेल्या उगार शुगर कारखान्याला ही नोटीस देण्यात आली आहे. यामुळे कारखान्यावर अवलंबून असलेले हजारो कामगार आणि शेतकरी हवालदिल झाले आहेत.

कोणतीही पूर्वसूचना किंवा योग्य पाहणी न करता प्रशासनाने अचानक ही कठोर कारवाई केली आहे. या निर्णयामुळे कारखान्यात कार्यरत असलेल्या ४,५०० हून अधिक कामगारांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे जगणे धोक्यात आले आहे. कारखाना सर्व पर्यावरण नियमांचे काटेकोर पालन करत असून, परिसरात दुर्गंधी किंवा प्रदूषणाचा कोणताही त्रास नाही. तरीही काही बिनबुडाच्या तक्रारींच्या आधारे ही नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. प्रशासनाने हा आदेश तात्काळ मागे न घेतल्यास उगार बंद ठेवून तालुका व जिल्हा स्तरावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार संघटनेचे अध्यक्ष के. एम. करीगाळी यांनी दिला आहे.

यावेळी के. एम. करीगाळी, एस. एम. कांबळे, ए. एच. नावलीगेर, एन. टोपीवाले, एस. एन. पुजारी, ए. ए. कामत, एम. जी. उल्लागड्डी, ए. बी. वाली आणि पी. व्ही. जोशी यांच्यासह अनेक कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags: