Kagawad

कोगनोळीतील उगार साखर कारखान्याविरोधात आदेशाला तीव्र विरोध

Share

कागवाड तालुक्यातील उगार साखर कारखान्याच्या इथॅनॉल प्रकल्पासंदर्भातील निर्णयाच्या विरोधात लाखो शेतकरी आणि हजारो कामगारांनी शुक्रवारी कागवाड येथे तीव्र आंदोलन केले.

उगार साखर कारखान्याच्या इथॅनॉल प्रकल्पावर पर्यावरण प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकतर्फी स्थगिती आदेश दिल्याचा आरोप करत या साखर कारखाना कामगार संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून निघालेली रॅली राणी चेन्नम्मा चौकातून नगरपालिका कार्यालयापर्यंत पोहोचली. तेथे मुख्याधिकारी महानतेश कौलापुरी यांना निवेदन सुपूर्द करण्यात आले.

८४ वर्षांची परंपरा असलेल्या या कारखान्यात सहनिर्मिती प्रकल्पाद्वारे वीज, मद्य आणि इथॅनॉल निर्मिती केली जाते. प्रदूषण नियंत्रण मंडळाने एकतर्फी कारवाई केल्याचा आरोप कामगार संघटनेचे अध्यक्ष के. एम. करिगार, उपाध्यक्ष श्रावण कांबळे, सचिव अनिल नावीलगर, सहसचिव एन. एन. टोपीवाले आणि कामगार रमेश कांबळे यांनी केला.

कारखान्याने सर्व नियमांचे पालन केले असूनही हा चुकीचा निर्णय घेण्यात आल्याचे रमेश कांबळे यांनी सांगितले. तर प्रदूषण मंडळाच्या सर्व सूचना पाळल्या गेल्या असून लढा सुरूच राहील, असा इशारा सचिव अनिल नावीलगर यांनी दिला.

इतर २९ साखर कारखाने विविध राजकीय नेत्यांच्या मालकीचे असताना केवळ याच कारखान्यावर कारवाई का, असा सवाल उपाध्यक्ष श्रावण कांबळे यांनी उपस्थित केला. या आंदोलनात कामगार संघटनेचे सदस्य, जनशक्ती सेवा संघ आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक राघवेंद्र खोत यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.

Tags: