बेळगाव शहरात महांतेश नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून आज पुन्हा एका भटक्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात वृद्ध व्यक्ती जखमी झाली आहे.

नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आज सकाळी महांतेश नगर परिसरातून जाणाऱ्या एका वृद्धावर भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्यामुळे परिसरातील रहिवासी आणि ज्येष्ठ नागरिक चिंतेत पडले आहेत.

बेळगावमधील महांतेश नगर मुख्य रस्त्यावरून लव्ह डेल शाळेकडे जाणाऱ्या मार्गावर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास एका भटक्या कुत्र्याने भयानक हल्ला केला. विशेष म्हणजे, याच कुत्र्याने या भागात यापूर्वीही अनेक नागरिकांवर हल्ले केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या भागात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण मोठे असून शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक प्रशासनाने आणि महानगरपालिकेने तातडीने कारवाई करून या भटक्या कुत्र्यांच्या त्रासावर कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी त्रस्त नागरिकांकडून होत आहे.


Recent Comments