बेळगावमध्ये देशभक्तीचे अभूतपूर्व वातावरण पाहायला मिळाले. स्वातंत्र्यदिन आणि ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीनिमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे (अभाविप) आयोजित करण्यात आलेल्या भव्य ‘तिरंगा यात्रेत’ हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते.


स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि ‘वंदे मातरम’ गीताच्या १५० व्या वर्षपूर्तीचे औचित्य साधून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) बेळगाव महानगर शाखेच्या वतीने शहरात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. बेळगावच्या रस्त्यांवर त्रिरंगी ध्वज हातात घेऊन निघालेल्या तरुणांच्या या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.


ही ध्वजयात्रा शहरांतील गोमटेश विद्यापीठापासून सुरू होऊन आर. एल. लॉ कॉलेज, आर. पी. डी. कॉलेज, आर. पी. डी. सर्कल आणि गोवा वेस मार्गे पुन्हा गोमटेश विद्यापीठात येऊन संपन्न झाली. या वेळी बोलताना अभाविपचे विभाग समन्वयक शिवय्या मठपती म्हणाले की, “व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रपुनर्रचना या अभाविपच्या ध्येयउद्देशानुसार देशातील तरुणांना संघटित करून भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याच्या दृष्टीने ही भव्य जनजागृती यात्रा आयोजित करण्यात आली आहे.”
या यात्रेत बेळगाव महानगरातील विविध महाविद्यालयांतील १,५०० हून अधिक विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षण संस्थांचे संस्थाचालक आणि अभाविपचे प्रमुख कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते. सुमारे ३५० मीटर लांबीचा भव्य राष्ट्रध्वज हातात धरून ‘वंदे मातरम’ आणि ‘भारत माता की जय’च्या घोषणा देत निघालेल्या तरुण पिढीच्या देशभक्तीपर मिरवणुकीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.


Recent Comments