Belagavi

हजारो भटक्या कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष उपाययोजना

Share

बेळगाव जिल्ह्यात तब्बल २८ हजारांहून अधिक भटके कुत्रे असून एबीसीच्या आदेशानुसार प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने शेल्टर होम उभारण्याचे निर्देश दिल्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.

बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, शेल्टर होममध्ये भटक्या कुत्र्यांचे लसीकरण आणि नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात येईल. हिंसक कुत्र्यांना शेल्टर होममध्येच ठेवावे लागेल, तर शांत स्वभावाच्या कुत्र्यांना सोडून दिले जाईल.

नागरिकांना आणि सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्यांना भटक्या कुत्र्यांचा त्रास होत आहे. महापालिकेच्या निविदा प्रक्रियेसाठी काही कालावधी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बेळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्राणीप्रेमी, पीठा संस्था आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली आहे.

न्यायालयाचे आदेश आणि राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार दोन टप्प्यांत काम केले जाणार आहे. भटक्या कुत्र्यांमध्ये हिंसक आणि शांत असे दोन प्रकार आहेत. शांत कुत्र्यांना कुठेही अन्न देण्याऐवजी एक निश्चित जागा ठरवावी लागेल. प्राणीप्रेमी आणि पीठा संस्थेशी चर्चा करून अन्न देण्याची जागा निश्चित करण्यात आली असून ती व्यवस्था महापालिकेतर्फे केली जाईल.

नागरिकांनी भटक्या कुत्र्यांना अन्न देताना जमिनीवर टाकू नये, तसेच त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याच्या सूचना महापालिकेला देण्यात आल्या आहेत. शासकीय शाळा आणि जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील हिंसक कुत्र्यांच्या टोळ्यांची ओळख पटवण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.

Tags: