Bagalkot

मुधोळचे आमदार आर. बी. तिम्मापूर यांच्या समर्थकांचा भडका: लोकापूरमध्ये महामार्ग रोखून तीव्र निदर्शने!

Share

मुधोळचे आमदार आर. बी. तिम्मापूर यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने बागकोट जिल्ह्यातील लोकापूर येथे संतापाची लाट उसळली आहे. आपल्या नेत्याला मंत्रिपदापासून वंचित ठेवल्याने आक्रमक झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली.

बागकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील लोकापूर शहरात आमदार आर. बी. तिम्मापूर यांना मंत्रिपद न मिळाल्याने काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थकांच्या वतीने भव्य आंदोलन छेडण्यात आले. बेळगाव-बागकोट महामार्गावर ठिय्या मांडत आंदोलकांनी आर. बी. तिम्मापूर यांची छायाचित्रे हातात धरून त्यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. या मुख्य महामार्ग रोखो आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती, ज्यामुळे वाहनधारकांचे मोठे हाल झाले. आपल्या नेत्याकडे सर्व पात्रता असतानाही त्यांना मंत्रिपदापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत, त्यांना तत्काळ मंत्रिमंडळात स्थान द्यावे, अशी मागणी समर्थकांनी केली.

या आंदोलनात स्थानिक काँग्रेस पदाधिकारी, आर. बी. तिम्मापूर समर्थक संघाचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: