State

म्हैसूरच्या कणाकणात भारताचा इतिहास : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्हैसूर येथील रामकृष्ण आश्रमातील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक युवा केंद्र आणि विवेक स्मारकाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी म्हैसूर हे प्राचीन काळापासून भारताचे सांस्कृतिक केंद्र असून येथील कणाकणात देशाचा इतिहास दडलेला असल्याचे सांगितले.

नारायण शास्त्री रोडवरील रामकृष्ण आश्रमात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांनी स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली. तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. त्यानंतर विवेकानंदांशी संबंधित दुर्मिळ छायाचित्रे, ऐतिहासिक दस्तऐवज आणि पत्रांचे अवलोकन केले. तसेच पुतळ्यासमोर काही काळ ध्यान करून सांस्कृतिक केंद्रातील विविध विभागांची पाहणी केली.

कार्यक्रमाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, एखाद्या व्यक्तीला महान बनण्यासाठी आयुष्यात कठोर तपश्चर्या आणि अनेक परीक्षांना सामोरे जावे लागते. ‘जीवनसेवाच शिवसेवा’ हा संदेश देणारे स्वामी विवेकानंद युवक संन्यासी म्हणून म्हैसूरला आले असताना येथील महाराजांनी त्यांच्या विचारांचा सन्मान केला होता. गुलामगिरीतील भारतातील युवक आज कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास घडवत असून जगाचे लक्ष भारताकडे वेधत आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सांगितले की, स्वामी विवेकानंदांना प्रोत्साहन देऊन भारताची कीर्ती जगभर पोहोचविण्यात म्हैसूरचा मोठा वाटा आहे. ‘युवा युग आणि नवयुग’ हा राज्याचा प्रमुख मंत्र असून युवकशक्तीचा विकासासाठी प्रभावी वापर करण्याची गरज आहे. पंतप्रधानांचा हा दौरा ऐतिहासिक असल्याची प्रतिक्रिया डी. के. शिवकुमार यांनी दिली.

या कार्यक्रमाला राज्यपाल थावरचंद गेहलोत, खासदार यदुवीर कृष्णदत्त चामराज वाडियार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, आमदार के. हरीशगौडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: