Belagavi

शाहूनगरातील गटारकामाचा वाद मिटला

Share

बेळगावच्या शाहूनगरातील मुख्य ८० फूट रस्त्यावरील गटाराच्या कामावरून निर्माण झालेला वाद अखेर मिटला आहे. स्थानिक नागरिकांच्या आंदोलनानंतर समाजसेवक प्रवीण पाटील यांनी मध्यस्थी करत तोडगा काढल्याने रखडलेले काम पुन्हा सुरू झाले आहे.

शाहूनगरातील विठलाई गल्ली कॉर्नर येथे सुरू असलेल्या गटाराच्या कामाला एका भूखंड मालकाने आपल्या जागेतून गटार जात असल्याचा आक्षेप घेत काम थांबविले होते. त्यामुळे रस्ता बंद झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या प्रकाराविरोधात संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या ठिकाणी सुमारे ३० वर्षांपासून गटार अस्तित्वात असून ते अचानक बंद करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांच्या अडचणीत भर पडली. भूखंड मालकाच्या भूमिकेबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

घटनेची माहिती मिळताच माजी उपमहापौर रेश्मा पाटील यांचे पती प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित भूखंड मालकाशी चर्चा करून तोडगा काढला. त्यांच्या मध्यस्थीनंतर महानगरपालिकेच्या ठेकेदाराला काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे वाहतुकीची अडचण दूर झाली असून गटाराचे कामही पुन्हा सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

Tags: