राज्यात दुष्काळाची परिस्थिती असतानाही सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे येत नसल्याचा आरोप करत भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी काँग्रेस सरकारवर टीका केली.

बळ्ळारी येथे पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले. मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या कार्यकाळात राज्याची स्थिती सुधारली नसल्याचा आरोप आर. अशोक यांनी केला. धरणांमध्ये पाणी नाही आणि सरकारच्या तिजोरीतही पैसे नसल्याचे सांगत काँग्रेस नेते मात्र दिल्लीत व्यस्त असल्याची टीका त्यांनी केली.

बळ्ळारी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर असून अनेक ठिकाणी पेरणी झालेली नाही. जिल्ह्यात केवळ ३८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. बळ्ळारी ग्रामीण भागातील शेतशिवारांना भेट देऊन पाहणी केल्यानंतर आर. अशोक यांनी काँग्रेस सरकारकडे निधी नसल्याचा आरोप केला. उत्पन्न देणाऱ्या विभागांवर लक्ष केंद्रित करून मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी तातडीने मदत जाहीर करावी. बँकांकडून शेतकऱ्यांना पाठवण्यात येणाऱ्या नोटिसा थांबवाव्यात आणि एक लाख रुपयांपर्यंतचे कृषी कर्ज त्वरित माफ करावे, अशी मागणी आर. अशोक यांनी केली. तसेच पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येक तालुक्याला ५० कोटी रुपये निधी द्यावा आणि एकरी ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर करावी, अशी मागणी त्यांनी केली. आगामी विधानसभा अधिवेशनापूर्वी सरकारने दुष्काळ जाहीर न केल्यास सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
कावेरी आणि तुंगभद्रा नदीच्या पाणी व्यवस्थापनावरूनही आर. अशोक यांनी राज्य सरकारवर टीका केली. कोणत्याही परिस्थितीत कावेरीचे पाणी तामिळनाडूला देऊ नये तसेच आंध्र प्रदेश आणि तेलंगणाला पाणी सोडून तुंगभद्रा धरण रिकामे करू नये, अशी मागणी त्यांनी केली. तुंगभद्रा पाण्यासाठी अंजनाद्रीपासून पदयात्रा काढण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने काँग्रेसपेक्षा अधिक निधी दिला असतानाही राज्य सरकार निधी नसल्याचे कारण देत असल्याचा आरोप आर. अशोक यांनी केला.


Recent Comments