खोदानपूर गावात बार आणि ढाब्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, हा बार ७ दिवसांत बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ‘कर्नाटक बहुजन चळवळी’सह गावकऱ्यांनी बेळगाव उत्पादन शुल्क विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे.

गावातील रस्त्यालगत असलेल्या या बारमुळे अनेक तरुणांचे यकृत निकामी होऊन कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. मद्यप्यांच्या त्रासामुळे शाळकरी मुली, शेतकरी आणि महिलांना रस्त्यावरून जाणे कठीण झाले आहे.

या वेळी गावकऱ्यांच्या वतीने बोलताना गीता पुजारी म्हणाल्या, “गावात बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या ढाबा व बारमुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असून तो तातडीने दुसरीकडे हलवण्यात यावा. शेताकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारीच ढाबा असल्याने तरुण मुलींना जाणे-येणे करताना भीती वाटत आहे.”

या वेळी गीता यांनी आपले पतीदेखील अतिमद्यपानामुळे वयाच्या २५ व्या वर्षी मरण पावल्याचे सांगत दुःखाश्रू ढाळले. “शासनाकडून मिळणाऱ्या ‘गृहलक्ष्मी’ योजनेचे पैसेही पुरुष बँकेतून काढून थेट ढाब्यावर दारू पिऊन उडवत आहेत. त्यामुळे महिलांच्या शांततापूर्ण जीवनासाठी हा ढाबा तात्काळ हटवण्यात यावा,” अशी मागणी त्यांनी केली.

या वेळी कर्नाटक बहुजन चळवळीचे पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments