बेळगाव येथील मध्यवर्ती बस स्थानकात परजिल्ह्यातून कर्तव्यावर येणाऱ्या बस चालक आणि वाहकांना (कंडक्टर) मूलभूत सुविधांअभावी तीव्र अडचणींचा सामना करावा लागत आहे.

यादगीर, म्हैसूर, कलबुरगी, बलारी यांसारख्या २० हून अधिक जिल्ह्यांतून बेळगावला येणाऱ्या कर्मचाऱ्यांना विश्रांतीसाठी योग्य खोली, स्वच्छतागृह यांसारख्या सुविधा उपलब्ध नाहीत. गेल्या दीड वर्षापासून मागणी करूनही प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही.

सध्या कर्मचाऱ्यांना बसमध्येच विश्रांती घ्यावी लागत असून डास, उष्णता आणि पावसाचा सामना करत रात्र काढावी लागत आहे. पुरेशी झोप न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा कर्तव्यावर रुजू व्हावे लागत असल्याने आरोग्य बिघडत आहे.

“रात्रभर बस चालवल्यानंतर योग्य विश्रांती मिळाली नाही, तर अपघाताचा धोका वाढतो. प्रवाशांच्या जिवाला काही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल संतप्त कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बेळगाव जिल्ह्यातीलच असतानाही कर्मचाऱ्यांना किमान सुविधा देण्यात अपयश आल्याचा आरोप केला जात आहे. चालकांसाठी विश्रांतीगृह आणि स्वच्छतागृह तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.


Recent Comments